ओमराजे निशाणा साधणार की, राणा दादांची इनिंग सुरू होणार..!

1,019

जळकोट : मेघराज किलजे

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत पाहावयास मिळाली. दोन मातब्बर आमने- सामने असताना, शेवटच्या टप्प्यात बहुजन वंचित आघाडीने प्रचारात जोर लावला होता. महायुतीचे ओमराजे निंबाळकर हे विजयाचा निशाणा साधणार आहेत की महाआघाडीचे राणाजगजितसिंह पाटील यांची आमदारकी नंतर खासदारकीची इनिंग सुरू होणार..! याचा फैसला दि. २३ मे ला कळणार असून, बहुजन वंचित आघाडी चा फटका कुणाला बसणार आहे. हे ऐकण्यासाठी जिल्हावासीयांचे कान आतुर झाले आहेत.

ऐन दुष्काळी परिस्थितीत देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. उन्हाच्या तडाख्यात प्रचाराचा धडाका तावून सुलाखून निघाला. उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातील अत्यंत चुरशीची लढत पाहावयास मिळाली. संपूर्ण जिल्हा दुष्काळाच्या झळा सोसत असताना, प्रचाराची झळ सोसत जिल्ह्यातील मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत प्रचाराचे रण चांगलेच पेटले होते. आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी एक मेकावर झडल्या.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघावर काही काळ काँग्रेसचे तर काही काळ शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. या मतदारसंघावर काँग्रेसने सर्वात जास्त अधिराज्य गाजवले आहे. त्यानंतर शिवसेनेच्या कल्पना नरहिरे, शिवाजी कांबळे व विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांनी मतदार संघावर कब्जा मिळवला होता. त्यानंतर आघाडीचे पदमसिंह पाटील यांनीहि पाच वर्षे खासदार म्हणून काम केले आहे.

एकंदरीत इतिहास पाहता उस्मानाबाद जिल्ह्याचे जिव्हाळ्याचे प्रश्न एकाही खासदाराला सोडवता आले नाहीत. विकास कामांचा नेहमीच शिमगा राहिला आहे. जिल्ह्यातील पाणी प्रश्न, रेल्वे प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न व औद्योगिक प्रश्न आदी प्रश्न जैसे थे आहेत तसेच आहेत. अशा नेहमी प्रमाणे होणाऱ्या निवडणुका या जनतेला भुरळ घालून जिंकल्या जातात. परंतु प्रश्न काही सोडवले जात नाहीत.

जिल्ह्यासमोर अनेक प्रश्न असताना यंदाची लोकसभेची निवडणूक पार पडली. यात महायुतीचे ओमराजे निंबाळकर व काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राणाजगजितसिंह पाटील यांच्यात सरळ सामना झाला. निवडणूक काळात विकास कामांच्या प्रश्नासंबंधी चर्चा होण्याऐवजी आरोप- प्रत्यारोपच जास्त झाले. वैयक्तिक पातळीवर झालेल्या टीकेमुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला.

काँग्रेस- राष्ट्रवादीच्या खऱ्या मनोमिलना मूळे व मन लावून प्रचार केल्याने आघाडीच्या प्रचारात कायमच रंगत राहिली होती. तर महायुतीच्या बड्या नेत्यांच्या प्रचार सभा यामुळे सतत ओमराजे निंबाळकर चर्चेत राहिले. प्रचार सभांच्या तुफान गर्दीमुळे पक्का विजय कोणाचा याबाबत तर्कवितर्कांना ऊत आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आदी दिग्गज नेत्यांच्या सभा झाल्या. सर्व सभांना तुफान गर्दी पाहावयास मिळाली. या गर्दीमुळे नेमके पारडे जड कोणाचे हे सांगणे कठीण आहे. अशी चर्चा ऐकावयास मिळत होती. एकंदरीत दोन मातब्बर एकमेकांविरुद्ध लढत आहेत. त्यात लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याच्या प्रश्नावर एकाही नेत्यांनी ठोस आश्वासन दिल्याचे ऐकावयास मिळाले नाही. सहकार क्षेत्राचे जिल्ह्यात वाटोळे झाले आहे. आज जिल्ह्यात दूध संघ, कारखाने, बँक, सुत मिल आदी सहकाराचे जाळे फाटले आहे. या प्रश्नावर एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. परंतु या सहकाराच्या जिल्ह्याच्या विकासाची चर्चा व्हायला पाहिजे होती. तशी अपेक्षा जिल्हावासीयांची होती. परंतु एकाही पुढाऱ्यांनी यासंदर्भात ठोस आश्वासन दिली नाहीत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील मतदार कुणाला कौल दिला. हे उद्या कळणार आहे.

ओमराजे निंबाळकर व राणा जगजितसिंह पाटील या एकाच घराण्यातील दोन मातब्बर या लोकसभेच्या निवडणुकीत आमने-सामने उभे होते. दोघांनीही रणमैदान गाजवून विजय आपलाच..! असा आत्मविश्‍वास व्यक्त केला आहे. परंतु या लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला व नंतरच्या काळात प्रचारात जास्त आघाडी नसलेल्या बहुजन वंचित विकास आघाडीचे अर्जुन सलगर यांनी मात्र शेवटच्या दोन दिवसात बहुजनांच्या थेट संपर्कावर भर देऊन प्रचार केल्याने जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीतील गटातटातील कार्यकर्ते एकत्र येऊन वंचित आघाडी ला मदत केल्याचे गावोगावचे चित्र आहे.

जिल्ह्यात बहुजनांची मते हे वंचित कडे ऐनवेळी गेल्याने याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. कमी गाजावाजा करून कासवगतीने केलेला प्रचार हि बहुजन वंचित आघाडी ची जमेची बाजू आहे. तर एक लाखापेक्षा अधिक मते बहुजन आघाडी ला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचा फटका दोन मातब्बर पैकी एकाला बसणार आहे. हे जवळपास निश्‍चित आहे.
एकंदरीत या लोकसभेच्या फडात महायुती व आघाडीत सरळ लढत झाली असली तरीही बहुजन वंचित आघाडी ला नाकारून चालणार नाही. हेच या निवडणुकीचे खरे चित्र आहे. या लोकसभेचा खासदार कोण? हे उद्या करणारच आहे. परंतु महायुतीचे ओमराजे निंबाळकर हे धनुष्य बानाने विजयाचा निशाणा साधणार आहेत की? महाआघाडीचे राणाजगजितसिंह पाटील यांची खासदारकीची इनिंग सुरू होणार आहे. हे ऐकण्यासाठी जिल्हावासीय आतुरलेले असताना, वंचित आघाडीचा फटका कुणाला बसणार आहे. याची चर्चा मात्र उद्याच होणार आहे. वीस पंचवीस हजार मताच्या अथवा त्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने नवा खासदार निवडून येणार आहे एवढे मात्र निश्चित.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!