खेलो इंडियामध्ये महाराष्ट्र १६६ पदकांसह आघाडीवर

29

पुणे : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. सोमवार अखेर एकूण ५९ सुवर्ण, ४८ रौप्य आणि ५९ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राचा संघ १६६ पदकांसह आघाडीवर राहिला.

केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणात यश मिळवित पदके मिळविली.

* जलतरण
महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जलतरणामध्ये पदकांची लयलूट करताना सोमवारीही कौतुकास्पद यश मिळविले. त्यांच्या केनिशा गुप्ता व अपेक्षा फर्नांडिस यांनी सुवर्णपदकाची कमाई केली. रौप्यपदक मिळविणाºया खेळांडूमध्ये महाराष्ट्राच्या आकांक्षा बुचडे, रुद्राक्ष मिश्रा, शेरॉन साजू यांचा समावेश आहे तर साहिल पवार, साध्वी धुरी यांनी ब्राँझपदक मिळविले. अपेक्षा हिने १७ वर्षाखालील मुलींच्या २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीचे सुवर्णपदक मिळविताना हे अंतर २ मिनिटे २७.५४ सेकंदात पार केले. याच वयोगटातील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यत केनिशा हिने २७.२८ सेकंदात जिंकली. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात आकांक्षा बुचडे हिला २०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने हे अंतर २ मिनिटे ३८.१३ सेकंदात पूर्ण केले. आकांक्षा हिची ही कामगिरी उल्लेखनीय आहे.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात रुद्राक्ष मिश्रा याने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना २५.०७ सेकंद वेळ नोंदविली. हरयाणाच्या वीर खाटकर याने ही शर्यत २४.७१ सेकंदात जिंकली. मुलींच्या २१ वर्षाखालील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत साध्वी धुरी हिला ब्राँझपदक मिळाले. तिने हे अंतर २७.९० सेकंदात पार केले. कर्नाटकची दीक्षा रमेश (२७.६७ सेकंद) व गुजरातची माना पटेल (२७.८१ सेकंद) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले.

मुलांच्या २१ वर्षाखालील ५० मीटर्स फ्रीस्टाईल शर्यतीत साहिल पवार याने २४.५३ सेकंद वेळ नोंदविली. त्याने गोव्याच्या जेरी डिमेलो याच्या साथीत संयुक्तपणे ब्राँझपदक मिळविले. कर्नाटकच्या एस.पी.लिकिथ याने ही शर्यत २४.१५ सेकंदात जिंकली. गोव्याचा झेवियर डिसूूझा याने रौप्यपदक मिळविताना हे अंतर २४.१७ सेकंदात पूर्ण केले.

मुलांच्या २१ वर्षाखालील १५०० मीटर फ्री स्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या सुश्रुत कापसे याने रौप्यपदक पटकाविले. सुश्रुत याने ही शर्यत १६ मि. २४.६८ सेकंदात पूर्ण केली. दिल्लीच्या कुशाग्र रावत याने १५ मि. ५९.०६ सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करीत सुवर्णपदक पटकाविले. तसेच दिल्लीच्याच विशाल गरेवाल याने १६ मि. ५७.७४ सेकंदात हे अंतर पूर्ण करीत कास्यंपदकाची कमाई केली.

मुलांच्या २१ वर्षाखालील ४ बाय १०० मीटर फ्री स्टाईल रिले प्रकारात महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रे, साहिल पवार, सुश्रुत कापसे, अ‍ॅरॉन फर्नांडिस यांच्या संघाने ३ मि. ४३.५१ सेकंदात रिले पूर्ण करीत कास्यंपदकाची कमाई केली. कर्नाटकच्या संघाने ३ मि. ३३.६८ सेकंदात आणि दिल्लीच्या संघाने ३ मि. ४२.०९ सेकंदात ही शर्यत पूर्ण करीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक पटकाविले.

* वेटलिफ्टिंग
सातारा येथील भाजीविक्रेता संतोष पवार यांनी आपली कन्या वैष्णवी पवार हिने आपल्या गावाचे नाव उज्ज्वल करावे हे पाहिलेले स्वप्न सोमवारी साकार झाले. वेटलिफ्टिंगसारख्या आव्हानात्मक खेळात महाराष्ट्राच्या वैष्णवी हिने ८१ किलो गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली व वडिलांचे स्वप्न साकार केले. तिने स्नॅचमध्ये ५४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ६४ किलो असे ११४ किलो वजन उचलले.

आंध्रप्रदेशच्या गायत्री रेड्डी हिने अनुक्रमे ४४ किलो व ६५ किलो असे एकूण १०९ किलो वजन उचलीत रौप्यपदक पटकाविले. तामिळनाडूच्या एम.दीपा हिने ४१ किलो व ६१ किलो असे एकूण १०२ किलो वजन उचलून ब्राँझपदक जिंकले.

* मुष्टीयुद्ध
महाराष्ट्राच्या आकाश गोरखा, मितिका गुणेले, संगीता रुमाले या खेळाडूंनी मुष्टीयुध्द खेळात विजयी वाटचाल राखली. आकाश याने १७ वषार्खालील गटातील फीदरवेट विभागात मणिपूरच्या लायशानग्बम सिंग याच्यावर ४-१ अशी मात केली.
मुलींच्या लाईटवेट गटात महाराष्ट्राच्या सना गोन्साल्विस हिने आव्हान राखले. तिने मिझोरामच्या रुडी लाल्मिंगुनी हिचा पराभव केला. ६३ किलो विभागात महाराष्ट्राच्या सुप्रिया मिश्रा हिला रुद्र्रिका कुंडु या हरयाणाच्या खेळाडूकडून पुढे चाल मिळाली. ६६ किलो गटात मितिका गुणेले हिने उत्तराखंडच्या लकी राणा हिच्यावर शानदार विजय मिळविला. महाराष्ट्राची हिरल मकवाना हिला मणीपूरच्या सानामाचा चानू हिच्याकडून पराभवास सामोरे जावे लागले. ५४ किलो गटात संगीता रुमाले हिने विजयी घोडदौड राखताना मध्यप्रदेशच्या दिव्या पवार हिला ४-१ असे हरविले.

* कबड्डी
महाराष्ट्राला कबड्डीमधील मुलींच्या विभागात संमिश्र यश मिळाले. २१ वर्षाखालील मुलींमध्ये त्यांनी पश्चिम बंगालचा ३३-२७ असा पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी १९-१२ अशी आघाडी घेतली होती. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी, सृष्टी चाळके व आसावरी कचरे यांनी जिद्दीने खेळ केला. पूर्वार्ध संपण्यास तीस सेकंद बाकी असताना सोनाली हिने लोण नोंदविण्याच्या दोन गुणांसह चार गुण मिळवित महाराष्ट्राला निर्णायक आघाडी घेतली. हीच आघाडी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली. पूर्वार्धातच शेवटची सहा मिनिटे बाकी असताना महाराष्ट्राला लोण नोंंदविण्याची संधी साधता आली नव्हती. उत्तरार्धात बंगालच्या खेळाडूंनी बोनस गुणांवर भर देत पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला तथापि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शेवटच्या पाच मिनिटांत त्यांना बोनस गुणांपासून वंचित ठेवले व सामना जिंकला. पश्चिम बंगालकडून सरोमा खातून हिने दिलेली लढत निष्फळ ठरली.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राला उत्तरप्रदेशकडून ३०-३१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात शेवटची पाच मिनिटे बाकी असताना महाराष्ट्राकडे २६-२२ अशी आघाडी होती. त्याच वेळी इलेक्ट्रॉनिक गुणफलक बंद पडला. तथापि गुणलेखक हाताने गुण मांडत होता. शेवटचे एक मिनिट बाकी असताना उत्तरप्रदेशकडे ३०-२८ अशी आघाडी होती. महाराष्ट्राने दोन गुण नोंदवित ३०-३० अशी बरोबरी साधली. सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर पंचांनी उत्तरप्रदेशला एक तांत्रिक गुण दिला. त्यामुळे त्यांचा संघ विजयी झाला.

* खो खो
अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुली, तसेच १७ वर्षाखालील मुले व मुली या वयोगटात अपराजित्व राखले आणि खो खो मध्ये बाद फेरीसाठी आव्हान राखले.

प्रेक्षकांच्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरु असलेल्या या स्पर्धेतील मुलांच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने पूर्वार्धात २०-४ अशी आघाडी घेतली होती. तेव्हांच पराभव मान्य करीत तामिळनाडूने सामना सोडून दिला. महाराष्ट्राकडून संकेत कदम (नाबाद तीन मिनिटे व एक गडी), अरुण गुणके (२ मि.५० सेकंद व ३ गडी) व मिलिंद कुरपे (तीन गडी) यांंनी उल्लेखनीय कामगिरी केली. महाराष्ट्राचा साखळी गटात हा सलग दुसरा विजय आहे.

मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने दिल्लीचा १२-७ असा एक डाव पाच गुणांनी पराभव केला. त्याचे श्रेय निकिता पवार (३ मिनिटे व एक गडी), प्रियंका भोपी (५ मिनिटे व एक गडी), अपेक्षा सुतार (२ मिनिटे व २ गडी) यांनी कौतुकास्पद खेळ केला. दिल्ली संघाकडून नसरीन हिने एक मिनिट ४० सेकंद व २ गडी असा खेळ करीत एकाकी लढत दिली.

मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने सलग दुसरा विजय नोंदविताना दिल्ली संघाचा १४-९ असा एक डाव पाच गुणांनी पराभव केला. त्या वेळी महाराष्ट्राकडून दिलीप खांडवी (२ मि.२० सेकंद व ३ गडी), ह्रषिकेश जोशी (नाबाद ३ मि.१० सेकंद व ३ गडी), रोहन कोरे (२ मि.२० सेकंद व ३ गडी) यांनी महत्त्वाची कामगिरी केली. दिल्ली संघाच्या सतीश व अजयकुमार यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने तामिळनाडू संघाचा १३-९ असा पराभव केला. यावेळी महाराष्ट्राकडून सृष्टी शिंदे (२ मि. २० सेकंद), किरण शिंदे (३ मि.), रितीका मगदूग (३ गडी) यांनी सुरेख कामगिरी केली.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!