खेलो इंडिया युथ गेम्स : कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश

32

पुणे : महाराष्ट्राला कबड्डीमधील मुलींच्या विभागात संमिश्र यश मिळाले. २१ वर्षाखालील मुलींमध्ये त्यांनी पश्चिम बंगालचा ३३-२७ असा पराभव केला. पूर्वार्धात त्यांनी १९-१२ अशी आघाडी घेतली होती.

पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडानगरीत खेलो इंडिया ही स्पर्धा सुरु आहे. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी, सृष्टी चाळके व आसावरी कचरे यांनी जिद्दीने खेळ केला. पूर्वार्ध संपण्यास तीस सेकंद बाकी असताना सोनाली हिने लोण नोंदविण्याच्या दोन गुणांसह चार गुण मिळवित महाराष्ट्राला निर्णायक आघाडी घेतली. हीच आघाडी महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरली. पूर्वार्धातच शेवटची सहा मिनिटे बाकी असताना महाराष्ट्राला लोण नोंंदविण्याची संधी साधता आली नव्हती. उत्तरार्धात बंगालच्या खेळाडूंनी बोनस गुणांवर भर देत पिछाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला तथापि महाराष्ट्राच्या खेळाडूंनी शेवटच्या पाच मिनिटांत त्यांना बोनस गुणांपासून वंचित ठेवले व सामना जिंकला. पश्चिम बंगालकडून सरोमा खातून हिने दिलेली लढत निष्फळ ठरली.

मुलींच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राला उत्तरप्रदेशकडून ३०-३१ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात शेवटची पाच मिनिटे बाकी असताना महाराष्ट्राकडे २६-२२ अशी आघाडी होती. त्याच वेळी इलेक्ट्रॉनिक गुणफलक बंद पडला. तथापि गुणलेखक हाताने गुण मांडत होता. शेवटचे एक मिनिट बाकी असताना उत्तरप्रदेशकडे ३०-२८ अशी आघाडी होती. महाराष्ट्राने दोन गुण नोंदवित ३०-३० अशी बरोबरी साधली. सामना संपल्याची शिट्टी वाजल्यानंतर पंचांनी उत्तरप्रदेशला एक तांत्रिक गुण दिला. त्यामुळे त्यांचा संघ विजयी झाला.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!