तुळजापूर तालुक्यात भिषण दुष्काळ; ६५ पैकी ५७ तलावात पाणीच नाही

81

नळदुर्ग, दि. १६ : तुळजापूर तालुक्यात गत वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊसकाळ झाल्याने त्याचा शेती उत्पादनावर परिणाम होवून सर्वच घटकांना भिषण दुष्काळी संकटाचा आज सामना करावा लागत असल्याचे दिसुन येत आहे. श्री क्षेत्र तुळजापूर व नळदुर्ग शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पामध्ये पाण्याच्या पातळीत लक्षणीय घट झाली असुन आज अखेर धरणात 2.10 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. प्रशासनाने धरणातील पाणी साठा पिण्यासाठी राखीव ठवले असतानाही बोरी धरणाच्या नदी पात्रातुन रात्रीच्या वेळी चोरुन बेशुमार पाणी उपसा होत असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सध्या तालुक्यातील 20 गावास 23 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तर 57 तलावात पाणीच नाही.

सन 2017 मध्ये पाऊस चांगला झाल्याने बोरी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामुळे या धरणातून उन्हाळी हंगामासाठी शेतीला पाणी कालव्याद्वारे सोडण्यात आले होते. मात्र 2018 मध्ये पाऊस समाधानकारक झाले नाही. परतीच्या पावसानेही पाठ फिरवली. तालुक्यात साठवण तलाव व लघु पाझर तलाव असे 65 तलाव आहे. तर कुरनूर मध्यम प्रकल्प, हरणी व खंडाळा असे तीन मध्यम प्रकल्प आहेत. तालुक्यातील एकमेव पळस निलेगाव प्रकल्प शंभर टक्के भरले होते. मात्र गत वर्षी समाधानकारक पाऊस न झाल्याने तालुक्यात नदी, नाले, तलाव, कोरडे पडले आहे. विहिरी, बोअर आटल्या आहेत. जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने जनावराची विक्री शेतकरी करीत असल्याचे दिसत आहे.

तुळजापूर तालुक्यातील साठवण तलाव व लघु पाझर तलाव आणि 3 मध्यम प्रकल्प असे मिळून एकूण 65 तलावापैकी 21 तलाव कोरडे ठाक पडले आहे. तर 37 तलावात उपयुक्त पाणीसाठा नाही. 8 तलावामध्ये जेमतेम पाणी आहे. या तलावात असलेले पाणी काही आठवडे पुरेल एवढाच पाणी उपलब्ध आहे. तर 20 गावास 23 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

चि. उमरगा, सलगरा दिवटी, फलवाडी, चिवरी क्र.1, चिवरी क्र.2, देवसिंगा (तुळ), वाणेगाव, वडगाव, केशेगाव, लोहगाव, सलगरा मड्डी, हंगरगा नळ, होर्टी क्र.1, येडोळा, चिकुंद्रा, गंजेवाडी, केमवाडी, मंगरुळ, आरळी, बंचाई, वडगाव लाख असे मिळून असे मिळून 21 तलाव कोरडे पडले आहे. तर किलज, निलेगाव, लघु प्रकल्प हंगरगा नळ, नंदगाव, शहापुर, खुदावाडी, सिंदगाव, कुन्सावळी, मध्यम प्रकल्प खंडाळा, ल. पा. होर्टी, होर्टी क्र.2, मुर्टा क्र. 2, अणदुर, जळकोट, काटी दहिवाडी, भारती ल. पा., सांगवी काटी, पिंपळा, सावरगाव, देवकुरळी, कदमवाडी, धोतरी, यमाई, कुंभारी, हरणी मध्यम प्रकल्प, इटकळ, दिंडेगाव, आरळी साठवण तलाव, हंगरगा तुळ ल. पा., कामठा, मसला, शिंदफळ, आपसिंगा, हंगरगा तुळ साठवण तलाव, ढेकरी, खंडाळा, तडवळा. असे मिळुन 37 साठवण तलाव व लघु पाझर तलावात उपयुक्त पाणी साठाच नाही.

तुळजापूर तालुक्यातील 65 तलावापैकी 8 तलावात दि. 14 मे अखेर पर्यंत उपयुक्त पाणीसाठा पुढील प्रमाणे आहे. तुळजापूर व नळदुर्ग शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या नळदुर्ग येथील कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्पात 2.10 टक्के पाणी साठा आहे. मुर्टा क्र.2 मध्ये 16.75 टक्के, अलियाबाद 18.13 टक्के, तामलवाडी 16.42 टक्के, सांगवी माळुंब्रा 1.03 टक्के, कसाई नांदुरी 4.01 टक्के, काळेगाव 0.92 टक्के, पळस निलेगाव 13.47 टक्के. याप्रमाणे तलावात उपयुक्त पाणीसाठा आहे.

तुळजापूर तालुक्यात कै. दमयंती हरीदास जगदाळे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अशोक जगदाळे यांनी स्वखर्चाने पाणी देवुन मोठा दिलासा दिला आहे. ग्रामपंचायतने अधिग्रहण करुन दिलेल्या विहिर, बोअर, येथुन 6 टँकरने एक दिवस 1 गाव या प्रमाणे 20 पेक्षा अधिक गावांना पाणी पुरवठा सुरु आहे. त्यामुळे तहानलेल्या गावांना जगदाळे प्रतिष्ठाणचा मोठा आधार लाभला आहे.

तालुक्यातील भिषण पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी 68 गावातुन 130 बोअर अधिग्रहण करण्यात आले असून सध्या तालुक्यात 21 गावामध्ये 23 टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आणखीण काही गावातुन टँकर सुरू करण्याची मागणी आली असून त्याचे प्रस्ताव मंजुरी साठी प्रशासनाकडे पाठविण्यात आले आहे.

तुळजापूर पंचायत समिती सभापती शिवाजीराव गायकवाड

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!