तुळजापूर विधानसभेच्या उमेदारीबाबत उत्सुकता; इच्छुकांची भाऊगर्दी

9,814

सध्या जिकडे तिकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आगामी काळात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीची चर्चा सुरू असताना तुळजापूर विधानसभा मतदार संघात मात्र सर्वच राजकीय पक्षातील इच्छुक उमेदवारांनी विधानसभेच्या निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आपल्या उमेदवारीची दावेदारी मजबूत करण्याकरिता वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमातून शक्तिप्रदर्शन करत पक्षश्रेष्ठीचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केल्याने आगामी विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही.

विशेष म्हणजे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासमोर स्वतःच्या पक्षातील तसेच मित्रपक्षातील काहीनी तिकीट मिळो अथवा न मिळो उमेदवारी दाखल करून उभे राहुन ताकद दाखविण्याची तयारी सुरू केल्याने हि निवडणूक रंगतदार ठरणार आहे.कारण तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या विधानसभा मतदारसंघावर शेतकरी कामगार पक्षाचा अपवाद वगळता नेहमी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे.

कै. माणिकराव खपले

एकेकाळी गोरगरिबांचा नेता म्हणून ज्यांची ओळख होती. ते तत्कालीन आमदार माणिकराव खपले हयात असताना या मतदारसंघावर काँग्रेस इतकाच शेतकरी कामगार पक्षाचा वर्चस्व होता. मात्र माणिकराव खपले यांच्या निधनानंतर महत्त्वाच्या लोकांनी पाठ फिरविल्यामुळे या मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाची पकड नाहीशी होऊन अस्तित्व संपुष्टात आले आहे. त्यामुळे आजच्या घडीला काँग्रेस पक्षा इतकी मोठी ताकद इतर पक्षात नव्हती. मात्र गेल्या काही वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या मतदारसंघांमध्ये प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे . त्याला कोणीही नाकारू शकत नाही. कारण ज्येष्ठ नेते नरेंद्र बोरगावकर यांनी यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक मोठी फळी निर्माण केली होती. तसेच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी स्वतः या मतदार संघात लक्ष घालून पक्ष वाढीसाठी प्रयत्न केल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तयार झाले आहेत. त्यात आता या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा सांभाळण्याची जबाबदारी नळदुर्गचे सपूत्र तथा राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांच्याकडे सोपविल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता काबीज करून ना खाऊंगा ना खाने दुंगा सांगत स्वच्छ कारभार करीत मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न केला.

तसेच तुळजापूर तालुक्यात गेल्या वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्यामुळे तसेच जनसंपर्कमुळे आज तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षला मजबूत स्थितीमध्ये मध्ये उभे करुन ठेवला आहे. समोरचा उमेदवार कोणीही असो आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढविणार आहोत असे अगोदरच जाहीर केल्याने. कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण झाली आहे.तसेच अशोक जगदाळे यांना राजकारणाचा अनुभव नसतानासुद्धा त्यानी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांना जोरदार लढत दिली होती.मात्र जवळच्या काही लोकांनी शब्द देऊन विश्वासघात केल्याने काही मतांनी पराभूत झाल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर पराभावातुन धडा घेत आगामी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगळी रणनीती तयार करुन पूर्ण तयारीनिशी कामाला लागलेले आहेत. दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणाबरोबर समाजकारण करून ज्यांनी स्वतःची स्वच्छ चारित्र्याचे राजकीय व्यक्तीमहत्त्व म्हणून एक वेगळे स्थान सर्वसामान्य लोकांच्या मनात तयार केले. ते जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे यावेळी कसल्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार जाहिर करुन निवडणुकीच्या तयारीला लागुन संपूर्ण मतदारसंघ पिजून काढण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे . आपण करीत असलेल्या कामाचा लोकांकडून प्रतिसाद कसा मिळतो हे पाहण्याकरिता त्यांनी नुकतेच आपल्या गावात एक मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करून चाचपणी केली. त्यात त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळत असल्याने विधानसभेच्या निवडणुकीत त्यांचे सर्वांच्या समोर मोठ्या प्रमाणात आव्हान असणार यात शंका नाही.

त्याचबरोबर या निवडणुकीत भाजप देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. पूर्वी या मतदारसंघामध्ये भाजपचे कार्यकर्ते फार कमी संख्येत होते. पक्षबांधणीसाठी जिल्ह्यातील नेत्यांनी परिश्रम घेऊन पक्ष वाढविण्यासाठी गावपातळीवर काम केले व एक मोठी पक्षाची ताकद निर्माण केली. त्यानंतर देवानंद रोचकरी यांच्या भाजप प्रवेशामुळे आता मतदार संघातील भाजप कार्यकर्त्यांना अच्छे दिन आले आहेत . कारण वीस वर्षाचा राजकीय अनुभव असलेले देवानंद रोचकरी यांनी देवराज मित्र मंडळाच्या माध्यमातून मतदार संघातील प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तयार केले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून देवानंद रोचकरी यांनी मागच्या काही निवडणुकीत विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासह मातब्बरांना जोरदार शह देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु कार्यकर्त्यांच्या अति आत्मविश्वासामुळे त्यात अयशस्वी झाले होते. आज भाजपाच्या गोटात विधानसभेच्या तिकिटाचे ते प्रमुख दावेदार आहेत.

भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य, तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील रहिवाशी असलेले अॅड. अनिल काळे यांनी मतदार संघात जोरदार मोर्चेबांधणी केले असून भाजप कडून तुळजापूर विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुक आहेत. अॅड. काळे हे पक्षाचे जुने नेते असून पक्षात त्यांचे वर्चस्व पाहता त्यांच्या उमेदवारीचा विचार होवू शकतो, अशी कार्यकर्त्यांतून चर्चा होत आहे.

त्याचबरोबर भाजपचे तिकीट घेऊन निवडणूक लढविण्यासाठी सहकार मंत्री तथा प भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख यांचे चिरंजीव रोहन देशमुख यांनीदेखील पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी साखर कारखाना, लोकमंगल मल्टीस्टेट को-ऑपरेटिव बैंक सामुदायिक विवाह सोहळे यांच्यासह विविध सामाजिक कार्यातून मतदार संघात संपर्क वाढविल्यामुळे व आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपचे तिकीटासाठी उत्सुक असल्याचे सांगत असल्याने त्यांचे कार्यकर्ते विधानसभेचे तिकीट रोहन देशमुखला फायनल असल्याचे सांगत निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यवान सुरवसे देखील उमेदवारीसाठी उत्सुक आहेत. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षात अनेक जण इच्छुक असल्याने भाजपाची उमेदवारी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात अनुभवी राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे असे वयाची 85 पार केलेले तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा एकदा निवडणूकीच्या आखाड्यात उडी घेत मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी सतत संपर्कात राहून समस्या सोडविण्या सोबतच पूर्ण झालेल्या विकास कामाचे लोकार्पण, नवीन कामाचे भूमिपूजन, विविध गावात बूथ कमिटीच्या माध्यमातून बैठका घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागा असा संदेश देत संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे, विधानसभेच्या निवडणुकीच्या आखाड्यात यावेळी तरुण प्रतिस्पर्ध्यांना मात देण्याकरिता जोमात काम सुरू केले आहेत.

तसेच आणखी एक इच्छुक चेहऱ्याने निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे ते म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धीरज पाटील यांनी नुकतेच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुळजापूर मतदारसंघातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून चाचपणी करण्याचा प्रयत्न केला. धीरज पाटील यांनी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदार संघातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत .तसेच त्यांच्यामागे देखील एक मोठा युवा वर्ग पाठीमागे असल्याने या विधानसभेच्या निवडणुकीत आपण थांबणार असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या देखील कार्यकर्त्यांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.

 

एकेकाळी तालुक्यात भाजप पेक्षा वरचढ असलेल्या शिवसेना पक्ष विधानसभेची निवडणूक येत्या काही महिन्यात होणार आहे ,तरीसुद्धा शिवसेनेच्या वतीने कोणाचेही नाव पुढे येत नसल्यामुळे शिवसेनेच्या गोटात थंडा थंडा कुल कुल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . यावेळी दुसऱ्या पक्षातून येणाऱ्या एका मोठ्या राजकीय नेत्याला विधानसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे आगामी विधानसभेची निवडणूक बहुरंगी होणार असल्याचे चित्र समोर येत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना-भाजप मध्ये युती हो अथवा न हो विद्यमान आमदार मधुकरराव चव्हाण यांच्यासमोर या तरुण त्रिकुटाचे आव्हान राहणार आहे कारण यापैकी काही जण तिकीट न मिळाल्यास बंडखोरी करून अथवा इतर पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविण्याच्या हिशोबाने तयारीस लागलेले आहेत. त्यापैकी काहीजणांनी शिवसेना तसेच बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांशी संपर्क साधत असल्याची चर्चा होत आहे.

– लतीफ शेख, नळदुर्ग

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!