दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी मंगळवेढा तहसिलसमोर स्वाभिमानी संघटनेचे आमरण उपोषण

58

मंगळवेढा : शिवाजी पुजारी

मंगळवेढा तालुका दुष्काळ जाहीर करावा, जनावरांच्या चार्‍याची सोय करावी, थकीत ऊस बिले मिळावीत, कृषी पंपाचा वीज पुर्वरत करावा या व अन्य मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते बुधवार पासून आमरण उपोषण बसले आहेत. दरम्यान, मंगळवेढ्यात दोन महसूल अधिकारी असताना एकाही अधिकार्‍याने दिवसभरात उपोषण स्थळाला भेट न दिल्यामुळे उपोषण कर्त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीच्या पेरण्या खोळांबल्या आहेत. खरीप पिके ही वाया गेल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने मंगळवेढा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शासनाच्या योजना लागू कराव्यात. सध्या जनावरांना चारा नाही त्यामुळे जनावरे अर्ध उपाशी पोटी राहत आहेत. यासाठी छावण्या सुरू कराव्यात. वीज वितरण कंपनीने शेती पंपाची वीज दोन तासाने कपात केल्यामुळे केवळ सहा तास वीज दिली जाते. यामध्येही अधून मधून वीज जात असल्यामुळे पीकांना पाणी देणे ही मुश्किल झाले आहे. शेतातील उभे पिके पाण्या अभावी करपून जात असल्यामुळे शेती उद्योग अडचणीत सापडला आहे. सध्या भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदीकाठावरील शेती उद्योग अडचणीत आहे तसेच काठावरील गावामध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

साखर कारखान्यांनी 2017-18 च्या गाळप हंगामातील ऊस बीलाची संपूर्ण रक्कम शेतकर्‍यांना अद्यापही दिली नाही. उर्वरीत रक्कम त्वरीत द्यावी. कारखान्यामधील कामगारांचा पाच महिन्यापासून पगार नसल्यामुळे कामगारांची उपासमार होत असल्याने त्यांचा पगार त्वरीत मिळावा. गतवर्षी 53 हजार शेतकर्‍यांनी खरीप हंगामाचा पीक विमा भरला होता. परंतू मंगळवेढा तालुक्याला वगळल्यामुळे शेतकर्‍यांवर अन्याय झाल्याने पीक विमा त्वरीत मंजूर करावा., कृषी पंपाचे जळालेले डी.पी. तात्काळ दुरूस्त करून मिळावेत आदी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते आमरण उपोषणास बसले आहेत.

उपोषणास बसण्यापूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तहसीलदार यांना दोन वेळा निवेदन दिले. मात्र या निवेदनावर अधिकार्‍यांनी कानाडोळा करून कुठलीही चर्चा न केल्याने उपोषण करण्याची वेळ आली असल्याची अ‍ॅड.राहुल घुले यांनी सांगितले. उपोषणाची दखल न घेतल्यास विविध संघटनेचा पाठींबा घेवून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!