निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणात आंतर मशागतीने शेतकऱ्यांचा घाम

70

जळकोट : मेघराज किलजे

सध्या निवडणुकीचा आखाडा पेटला आहे. या पेटत्या वातावरणात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. एकीकडे लोकसभेचे वातावरण तापत असताना, दुसरीकडे एक वेळच्या भाकरीसाठी बळीराजा मात्र आपल्या शेतात जमिनीची मशागत करण्यात व्यस्त दिसत आहे.

या वर्षी कडाक्याच्या उन्हाळ्यात लोकसभेच्या निवडणुक पार पडत आहेत. देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीत नेतेमंडळी व कार्यकर्ते कामाला लागले आहेत. जो तो नेता, कार्यकर्ता, पदाधिकारी सकाळपासूनच आपल्याच पक्षाचे बाजू मांडताना दिसत आहेत. जसजसे उन्हाची तीव्रता जाणवत आहे. तस तसे प्रचाराचे रान तापत आहे.

सध्या सकाळ अन संध्याकाळी गावागावात विविध पक्षाची चर्चा ऐकावयास मिळत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीबरोबरच तापलेल्या जमिनीची मशागत करण्यात बळीराजा मात्र व्यस्त दिसत आहे.

नेतेमंडळींचे प्रचाराने घाम निघत असताना, शेतकऱ्यांचा घाम आंतर मशागतीने निघत आहे. ज्या बळीराजाला दिवसाच्या भाकरीची चिंता वाटत आहे. निवडणूक प्रचार, चर्चा यापासून दूर राहून शेतकरी भल्या पहाटे सर्जा-राजाच्या जोडीला शेतात नेऊन आपल्या जमिनीची मशागत करताना दिसत आहे. गेल्या वर्षीच्या दुष्काळाने शेतकरी पार होरपळून निघाला आहे. त्याच्या पदरात पिक विमा तेवढा पदरात पडला आहे. व दुष्काळ अनुदानाने कसेतरी प्रपंच भागला आहे. खरीप रब्बी हंगामात पेरलेल्या बियाणाचे व आंतरमशागतीचे पैसेही मिळाले नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्या उत्पन्नावरच सर्वकाही अर्थव्यवस्था अवलंबून असते. परंतु या शेतकऱ्यासमोर नेहमीच नैसर्गिक संकट उभे राहिले आहे. या वर्षी तरी चांगला पाऊस काळ होऊन उत्पन्न मिळेल या आशेने जमीन नांगरून, कु ळहुन जमीन पेरणीसाठी सज्ज करत आहे. सध्या गावागावातील शिवारा शिवारात सकाळी व सायंकाळी शेतकरी जमिनीचे अंतर मशागत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. सध्या या कामाला वेग आला असून लोकसभेच्या तापलेल्या वातावरणात शेतकऱ्याचा घाम मात्र निघतच आहे.

लोकसभेच्या तापलेल्या वातावरणात तापलेल्या उन्हात व तापलेल्या मातीत बैलाचे व आपले पाय फिरवत आहे. त्याला ना निवडणुकीची चिंता…! ना…! मतदानाची काळजी..! शेतकरी राजाला भाकरीची काळजी पडली आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!