लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर; महाराष्ट्रात ४ टप्प्यात होणार निवडणूका

67

नवी दिल्ली दि, १० :

लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा आज (रविवार) करण्यात आली. आगामी निवडणुका ७ टप्प्यात होणार असून १ ल्या टप्प्याची निवडणूक ११ एप्रिल रोजी होणार असून त्याची अचारसंहिता आज दि.१० तारखे पासूनच लागू झाली आहे. तर निवडणूकीचा निकाल २३ मे ला जाहीर होणार असल्याची माहिती राजधानी दिल्लीतील विज्ञान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी दिली.

निवडणुकांच्या तारखा नेमक्या कधी जाहीर होणार, याबाबत गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू होती. या निवडणुकांची घोषणा ८ मार्चलाच होईल असा अंदाज बांधण्यात येत होता. पण अखेर आज निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूकीच्या तारखा जाहिर केल्या.

२०१४ च्या तुलनेत यांदा 8 कोटी 43 लाख मतदार वाढले आहेत. देशातील मतदारांची संख्य ९० कोटींच्या घरात पोहचली आहे. १८ ते १९ वयोगटातील तरुणांची संख्या दीड कोटी असून १ कोटी ६० लाख सरकारी नोकरदार निवडणूकीचा हक्क बजावणार असल्याचे सुनील अरोरा यांनी सांगितले. तसेच देशात १० लाख मतदान केंद्र असणार आहेत. ईव्हीएमवर उमेदवाराचा फोटो दिसणार आहे. मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करणार असल्याचेही अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

उमेदवाराला आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे आवश्यक आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत. ईव्हीएम मशीनवर जीपीएसद्वारे लक्ष ठेण्यात येणार आहे. आपले मतदार यादीतील नाव माहिती करून घेण्यासाठी मतदारांनी १५९० या हेल्प लाईन (टोल फ्री) क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील सर्व माहिती जाणुन घेण्यासाठी १९५० हा हेल्प लाईन क्रमांक सर्वांसाठी खुला करण्यात आला आहे.

देशभरात ७ टप्प्यात होणार निवडणुक

पहिला टप्पा- ११ एप्रिल – ९१ जागांसाठी मतदान होईल
दुसरा टप्पा- १८ एप्रिल – ९७ जागांसाठी मतदान होईल
तिसरा टप्पा- २३ एप्रिल – ११५ जागांसाठी मतदान होईल
चौथा टप्पा- २९ एप्रिल – ७१ जागांसाठी मतदान होईल
पाचवा टप्पा- ६ मे – ५१ जागांसाठी मतदान होईल
सहावा टप्पा- १२ मे – ५९ जागांसाठी मतदान होईल
सातवा टप्पा- १९ मे – ५९ जागांसाठी मतदान होईल
महाराष्ट्रात चार टप्प्यांत होणार निवडणूका
पहिला टप्पा- ११ एप्रिलला ७ जागांसाठी मतदान होणार
दुसरा टप्पा – १८ एप्रिलला १० जागांसाठी मतदान होणार
तिसरा टप्पा – २३ एप्रिलला १४ जागांसाठी मतदान होणार
चौथा टप्पा – २९ एप्रिल १७ जागांसाठी मतदान होणार आहे.

error: चोरी करणे हा गुन्हा आहे!!